बाईपण भारी देवा!.
शीर्षक:-परिक्षा.
” जन्म बाईचा बाईचा,
कष्टाच्या घागरी फुंकण्याचा”.
स्त्री जेव्हा जन्माला येते,तेव्हा एक कुटुंब जन्माला येते असे म्हणतात.म्हणजे ती मोठी होऊन आणखी एक कुटुंब तयार होते.ह्या सगळ्या प्रवासात एक मुलगी, बहीण, पत्नी,आई,सासू,आजी अश्या सर्व भुमिका ती विवीध कौशल्य पणाला लावून निभावते.प्रत्येक पायरीवर तीची आत्मपरिक्षा असते.
बरे हे सगळं निभावत असतांना ती जगणे सोडते का? तर अजीबात नाही.उलट नटणे,मुरडणे, हौसेने सजणे,सजवणे,सण, समारंभ, हळदीकुंकू, केळवण, डोहाळजेवण, सगळीकडे विद्युलतेप्रमाणे तळपत असते.मग ते मैत्रीणी जमवून भोंडला असो की, नवरात्रात ९ दिवस उपवास करून वेगवेगळ्या रंगात झळकणे असो.
मला स्वतःला स्त्री जन्म फार म्हणजे फार आवडतो.हं! आता प्रत्येक महिन्याचे काही दिवस तीची परिक्षा पहाणारे असतात. समाजाकडून मिळणारे अल्प संरक्षण, स्त्री असल्याने पावलोपावली जपावे लागणारे शील,ह्या बाबी सांभाळता येऊ लागले तर ” बाईपण भारी देवा”!.
मला नेहमी वाटतं, स्त्री चा खरा शत्रू तीचे स्वतः वर नसणारे प्रेम ! हे प्रेम जर जागृत झाले तर ती स्वतःला जगण्यास खुप समर्थ बनवू शकते.आपल्यातील त्रुटींवर मात करू शकते.
पुरूषांपेक्षा कुठेही कमी नसणारी स्त्री, जेव्हा पुरूषांकडून सहानुभूतीची,आरक्षणाची अपेक्षा ठेवते,तेव्हा मात्र मला खरंच राग येतो..
परमेश्वराने पण आपल्याला नव- निर्मितीचे वरदान, स्त्री ची क्षमता ओळखूनच दिले आहे नां?मग का परावलंबित्व स्विकारता?.मृदुता,लाघवीपणा, सगळ्यांना सांभाळून घ्यायची वृती,हे विशेष अलंकार देऊन परमेश्वराने बाईला घडवले आहे.त्याचा फक्त योग्य वापर करा गं !.
” नको टाकू गं उसासे,
बाई जन्म मिळाल्याचा,
पाळण्याची दोरी हाती,
हेवा कर स्व भाग्याचा!”.
सौंदर्य हे वरवरचं असते ,पण प्रत्येक स्त्री अंतर्बाह्य सुंदर असते.कोणी रूपाने,कोणी रंगाने,कोणाचा आवाज,कोणाची उंची, बांधा,कोणाचा स्वभाव! इ.इ.
तर मग मैत्रीणींनो गर्वाने म्हणा आमचा जन्म सुंदर आहे!.