माझी लेह लडाख ट्रिप!
१४ जुन २०१५ ला ,मी व माझ्या ३ बहिणींनी लेहलडाख ट्रिपचे नियोजन केले होते.सगळ्यांच्या प्रापंचिक समस्या आड येत असल्याने ,नवऱ्यांनी संसार सांभाळायचा व बायकांना थोडी मौजमस्ती करायास वाव द्यायचा अशी तडजोड झाली.
फक्त परमुलुख म्हणून एका बहिणीचे यजमान (ज्यांना स्वत: लेह बघायचेच होते) आमच्याबरोबर आले.अजुन एक हौशी मैत्रीण पण आली.
श्रीनगर ते लेह व बॅक टू श्रीनगर अशी एक लोकल पर्यटन संस्थेद्वारे सगळे बुकिंग आॅनलाईन करून,आम्ही बोरीवलीवरून जम्मुतावीत बसलो.
नवरे बरोबर नसल्याने,पेलेल एवढेच सामान प्रत्येकीने घेतले.येतांना विमानाचे आरक्षण मिळाले होते.खुप गप्पा मारत प्रवास सुरू झाला.
जम्मुला आम्हाला आमचा टुर ड्रायव्हर भेटला.किरकोळ शरीरयष्टिचा व पहाडी तोंडवळणाचा! जरा साशंकच झालो पुढचे ८दिवस कसे जातील?पण रिगझींग ने सगळे खोटे ठरवले.
अतिशय मनमिळाऊ व दिलदार माणूस होता तो.
पहिला मुक्काम पटनीटाॅपला होता.मध्ये झिरो पाॅईंटवर खुप बर्फ मिळाला त्यात मनसोक्त हावरटपणे खेळलो.पुढे अर्ध्या तासातच निसर्गाने डाव टाकला,हिमकडा कोसळल्याने वाहतुक बंद पडली.आमच्या जीपपुढे खुप वाहने अडकली होती.मिलटरीचे जवान पोहचेस्तोवर सगळे ड्रायव्हर खाली उतरून रस्ता साफ करू लागले.बऱ्याच वेळांनी हळू हळू एक एक वाहन सरकू लागले.ह्यामुळे आम्ही पटनी टाॅपला रात्री खुप उशिरा पोहचलो.पण गरम जेवण आमची वाटच बघत होत.
दुसऱ्या दिवशी थोडे काश्मिर दर्शन करून आम्ही लेह लडाखला रवाना झालो.
पुर्ण रस्ता कुठे दोन्हीकडे बर्फाचे डोंगर तर कुठे रूक्ष खडक!वेगवेगळ्या रंगाच्या डोंगराने लक्ष वेधून घेतले होते.
लेहपर्यंतचा प्रवास खुप कठिण आहे.खार्दुला पासवर तर श्वास घेणे कठिण जात होते.मग गरमागरम थुकपा सुप घेतले तेव्हा जीवातजीव आला.
दुसऱ्या दिवशी लेह दर्शन,कारगिल स्मारक व वेगवेगळे बौद्ध स्तूप बघितले.एक दिवस लडाख, तीथे तंबुतला मुक्काम,वाळवंट दर्शन,एक दिवस पेन्गाॅन लेक व तिथली जिवघेणी थंडी अनुभवत केलेला तंबुतला मुक्काम अजुनही डोळ्यांसमोर येते.पेन्गाॅन लेकच्या पाण्यावरच्या सप्तरंगी मनभोर छटा नजर खिळवूनच टाकतात.
थ्रि ईडियट्स चे थोडे शुटींग इथे झाल्याने ती शाळा,वती भिंत ह्यांना पर्यटन महत्व आलेय.
लेह व लडाख ह्यांना नैसर्गिक सौंदर्यांचा वारसा लाभलाय.इथले पहाडी कष्टमय जीवन बघतां आपल्या सुखाची लाज वाटते.गरम कपड्यांची थोडी खरेदी व तेथील लोकल जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला.
परतीचा प्रवास विमानाद्वारे असल्याने पटकन संपला.आज परकिय नजरा ह्या भागावर आक्रमण करू पहात आहेत .काश्मिरची जशी वाट लागली तशी ह्या प्रदेशांची वाट लागण्याआधीच हा प्रवास केला ह्याचे मनास समाधान आहे.
“शुभं भवतू”