ती: देवी की दासी?
शीर्षक:- ती: एक माणूस!.
शब्द संख्या -२७५.
” उदे गं अंबे उदे,
उदे गं अंबे उदे”
घराघरात सध्या घट बसलेत,अंबेच्या नावाचा गजर होतोय.पण घरची अंबा?ती पुर्णपणे दुर्लक्षीत! तीचे ९ दिवसांचे उपवास, नोकरी,घरचे कुळधर्म, कुळाचार सगळ्या स्तरांवर कसरती चालूच आहेत.स्त्रीत्वाची पुजा करणारा माणूस स्वतःच्या बायकोला मात्र रितसर राबवताना दिसतो.रुढी परंपरेचे जोखड तीच्या मानेवर घट्ट रोवतो.
आणि ती? ह्याच पारंपरिक चक्राची जन्मजात सवय असल्याने, कुठलाही निषेध न नोंदवता हसतमुख राहून सगळे निभावून नेते.पहाणाऱ्याला मात्र संभ्रम पडतो की ही घरची दासी आहे का?.
अर्थात आता चित्र खुप बदललंय!. स्त्री विचारी झाली आहे.तीला स्वत्वाची जाणिव झाली आहे.म्हणतात नां “तुम्हाला स्वतः खेरिज कोणी सुखी करू शकत नाही” म्हणजे जर तुम्ही सुखी राहायचं ठरवले असेल, तर स्वतःच्या सुखाचे मार्ग स्वतःच शोधले पाहिजे!.
आधुनिक स्त्री व्यायाम, योग्य आहार , स्वावलंबीपणा, विज्ञानाची कास ह्यांचा अवलंब करताना दिसते.तीला सुखाचे मार्ग गवसू लागले आहेत.आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर ती घरकामात करून वेळ वाचवते,व त्या फावल्या वेळेचे नियोजन नीट करू पाहते.
स्त्री चा मेंदू मुळातच बहुआयामी (multitasking)असतो.म्हणजे एकाच वेळी ती वेगवेगळी कामे सहज हाताळू शकते .ह्या रूढार्थाने ती अष्टभुजा देवीच असते की घरातली!.
आता प्रत्येकाने “प्याला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे” जसे आपापल्या बुद्धी व विचारानुसार ठरवायचे असते, तसेच घरातील बहुतांश कामे कौशल्याने व झपाट्याने पार पाडणारी स्त्री,ही गृहलक्ष्मी आहे की दासी हे बघणाऱ्याच्या व स्वतः त्या स्त्रीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
माझ्या मते ना ती ” देवी” ना ती “दासी”! ती फक्त एक कुटुंबातील महत्वाची सदस्य आहे! व तो मान तीला प्रत्येकाने दिला पाहिजे,वा तीने मिळवला पाहिजे.घरची स्त्री सुखी असली की कुटुंब सुखी होते.
“सुने सुने जग झाले,
गृहिणी वीना घर हाले,
लक्ष्मी फिरवते पाठ,
वैचारिक दैन्य आले”.
अशी अवस्था घरच्या बाईवीना एखाद्या दुर्दैवी कुटुंबाची होते.त्यामुळे घरची लक्ष्मी सांभाळा! तीला मोकळा श्वास द्या, स्वातंत्र्य द्या.