कातरवेळ

“डोळ्यात सांजवेळी,आणू नको ग पाणी”रेडिओवर आर्त भावगीत लागले होते.वेळ तिन्हीसांजेचीच असल्याने थेट हृदयाला भिडत होते.

लहानपणापासून एकच शिकवण आम्हाला दिली जाते.तिन्हीसांजेला”हे करायचे नाही,ते करायचे नाही”घराबाहेर रहायचे नाही, अपशब्द अपविचार बोलायचे नाही इ.इ….त्यामुळे ही वेळ जीवनात खास वेळ आहे असा पगडा बसला.

हळूहळू जस जशी मोठी होत गेले,तसे ह्या वेळेस कातरवेळ म्हणतात असेही समजले.मग मनात कुतुहल जागे झाले.दिवस सरतांना व रात्र उगवतांना ही धुसर वेळ!.आजीला विचारले तर म्हणाली “अग ही हुरहूर लावणारी वेळ आहे ,म्हणून ह्याला कातरवेळ म्हणतांत”.

खरेच बाहेरून घरी येणाऱ्या माणसांची वाट बघण्यातील ,हुरहूर ह्या वेळेस लागते.अश्या वेळी, घरातला एकटेपणा जास्तच अंगावर येतो.आपल्या माणसांचा सहवास अवतीभवती असावासा वाटू लागतो.ह्या परिस्थितीचे वर्णन “जिव्हाळा” चित्रपटात फार सुंदर केले आहे!

“दहा दिशांनी दाटून येईल,

अंधाराला पुर,अश्या अवेळी,

राहू नका रे,आईपासून दुर”

पण हीच कातरवेळ शुभ करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे.ह्या वेळेस अशुभ न ठरवता ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे म्हणून,सगळे घर दिव्यांनी उजळले जाते.तिच्या आगमनासाठी “शुभंकरोती”म्हटली जाते.ह्या अशुभ वेळेपासून रक्षण करण्यासाठी “रामरक्षा” म्हटली जाते.

प्रेमी युगुलांना मात्र ही वेळ खुपच सोयीची व जवळची वाटते.चोरून एकमेकांना भेटत, समुद्रकाठी सूर्यास्ताच्या साक्षीने,प्रितीच्या आणाभाका घेतल्या जातात.

कोणी प्रेयसी दटावते”शाम ढले ,खिडकी तले…..”

वृद्धांना मात्र ही कातरवेळ नकोसे करते.जीवलगांच्या आठवणींनी त्यांना गलबलून येते.म्हातारपणी जीव घाबरा होण्याची हीच वेळ!.

पण मला स्वत:ला ही वेळ, दुसऱ्या दिवशीच्या भविष्याचे पडघम वाजवत येणारी वेळ वाटते.आत्ता अंधार संपून उद्याची पहाट उगवेल .दिवस सरत आल्याची खुण वाटते.

अशा सांजवेळी,तुळशीजवळ दिवा लावून,शांतपणे आकाशातल्या छटा बघत बसणे हा माझा स्वर्गीय अनुभव आहे.स्वत:चा स्वत:शीच छान संवाद एकांतपणे साधतां येतो.म्हणूनच ह्या कातरवेळेला ,शुभ अशुभ असे न मानता मी आपला राखिव वेळ मानते!.

शुभं भवतू.

error: