विषय:- माझे शिक्षक!

शिर्षक:- देशपांडे बाई (आई)

तुम्हाला शिर्षक वाचून हसायला आले असेल नां? आई?
हो आमची अख्खी शाळा आमच्या देशपांडे बाईंना आई म्हणूनच ओळखायची. नव्हे आम्ही मुलांनीच ठेवलेले ते टोपणनांव होते!.

उंच सडसडीत व्यक्तीमत्व व एक देखणा चेहरा! मोठ्ठ कुंकु त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याला शोभून दिसे. लांब व कुरळ्या केसांचा पाठीवर एक शेपटा. अत्यंत मृदु व लाघवी आवाजात त्या बोलायच्या. एक प्रकारचे सात्विक वलय त्यांच्या भोवती असे.

कितीही नाठाळ मुलगा त्यांच्यासमोर सुतासारखा सरळ असे! त्यांना मी कधीही उंच आवाजात, कोणावर ओरडतांना बघितले नाही. ७वी ते १०वी वर त्या मराठी व इंग्रजी विषय शिकवायच्या. भाषेचा पदर कसा हळूहळू उलगडत जाई. व्याकरण असो की कविता, अत्यंत मधाळ आवाजात, मुलांना समजेस्तोवर त्या शिकवत. त्यांनी शिकवलेली कविता लगेच मुखोद्गत होऊन जाई व व्याकरण मेंदुपटलावर कोरले जाई. त्यांनी शिकवलेले आजतागायत विसरले नाही.

मला एक प्रसंग छान आठवतोय. एक वात्रट मुलगा आमच्या वर्गात नविन आला. त्याने देशपांडे बाईंच्या तासाला त्या फळ्यावर लिहीत असतांना पक्षाचा आवाज काढला. बाईंनी तत्काळ मागे वळून त्याला हेरले, व उभे केले! त्या मुलाचे नांव माहित असुन सुद्धा, परत विचारले. तो म्हणाला “संतोस” बाई फक्त म्हणाल्या “संतोष” म्हणावे रे’! अख्ख्या वर्गासमोर भाषेचा अशुद्ध पणा दाखवत, त्याची लाज न ओरडतां काढली. त्या मुलाने परत कुठल्याच शिक्षकांची खोडी कधीच काढली नाही!

देशपांडे बाई शाळेत अजुन प्रसिद्ध होत्या त्यांनी चालवलेल्या आर्थिकद्रष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी १०वी च्या वर्गांसाठी! रोज शाळा सुटल्यानंतर २ तास, मराठी, इंग्रजी, बरोबरच गणित,सायन्स, समाजशास्त्र सगळे विषय त्या इतक्या लिलया ह्या वर्गांवर शिकवत की, वर्गाला विसर पडे की त्या कुठल्या विषयाच्या शिक्षिका आहेत!
नववीच्या उन्हाळी सुट्टींपासुन हे वर्ग सुरू होत. मला अभिमान वाटतो की मी ही ह्या वर्गाचा लाभ घेतला. बाईंच्या उत्तम मार्गदर्शनामुळे मला ८८% दहावीला मिळून चांगल्या काॅलेजला सायन्सला प्रवेश मिळाला.

आमची शाळा खाजगी होती. तीला शासकीय अनुदान नव्हते. सहाजीकच शाळेची फी जास्त होती. ती वेळेवर भरणे कधी कधी काही मुलांना शक्य नसे. ती सर्व मुले देशपांडे बाईंच्या आश्रयास येत. वेळेवर त्यांची फी भरली जाई. मग जमेल तसे बाईंचे पैसे ती मुले परत करत. पण बाई त्याचा हिशोब कधीच मागत नसत!

असे शिक्षक आता होणेच विरळा! आत्ताच्या ह्या व्यवहारी जगात मला बाईंची खुप तीव्रतेने आठवण येतेय, कारण मी पण त्यांच्यासारखी चांगली उत्तम शिक्षिका बनायचा प्रयत्न करतेय. चांगली पिढी हाताखाली तयार व्हावी म्हणून झटतेय! त्यांच्या आशिर्वादाने, व उत्तम संस्कारांनी हे घडावे अशी आशा बाळगतेय! अश्या प्रसंगी एकच गाणे ओठी येतेय.

“गुरुने दिला ज्ञानरूपी ,वसा’
आम्ही चालवू हा पुढे वारसा”

error: