कथा

कथा माणसांना सत्याचे दर्शन घडवतात, तर कधी कल्पनेच्या राज्यांत घेऊन जातात.कथेमधील पात्रे जिवंत होऊन मनावर राज्य कधी करतात तेच कळत नाही.मुलांबरोबर पालकांचेही थोडे मनोरंजन करण्याचा हा प्रयत्न .

Ghoshti dotcom

 पुस्तकावर क्लिक करा

विषय:- न फिटणारे ऋण !

पुनर्जन्म

“ सदाशिव ए सदा’ ऊठलास का रे?” भिमा , मोठमोठ्याने आरोळी देतच सदाशिवच्या घराचे दार ठोठावत होता. “काय रे? काय झाले? एवढ्या सक्काळी , सक्काळी?”सदाने दार उघडतच विचारले.
हातातला गुच्छ पाठीमागे लपवत भिमा म्हणाला”आज वहिनींच्या हातच्या चहाची तल्लफ आली बघ!”व पटकन त्याने फुलांचा गुच्छ समोर करत म्हटले”Happy birthday my dear friend’ जीयो हजारो साल !”
सदाच्या डोळ्यात टचकन् पाणीच आले.किती जीवास जीव देणारे,हे आपले मित्र !दोघांचा प्रेमालाप चालूच होता ,की १०,१२ शाळकरी मुलांनी सदाशिवला गराडा घातला.
“सर आधी हे घ्या! सर आधी माझे”कोणी ग्रिटींग ,कोणी फुले सदाशिवच्या हातात देऊन,पटापट पायावर डोके ठेवून मुले पळालीसुद्धा !
भांबावलेल्या सदाशिवला राधेने कोपरखळी मारली,”आज मज्जा आहे बुवा एका माणसाची!आज एक माणूस हवेतच तरंगणार बहुतेक!राजु ,संजु आज तुमचे नाही हं लाड” . सदाशिव मात्र स्वत:तच हरपल्यागत होता.
आज आनंदवनात खुप उत्साहाचे वातावरण होते.सदाशिवचा ५०वा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा होणार होता.रखमाईने एक मोठ्ठी झाडावर पिकलेली पपई स्वयंपाकघरात दिली.जगू माळ्याने देखील बागेतील चिक्कू ,संत्रे ,केळी आदी खुप फळे रामा आचाऱ्याला नेऊन दिली.आज सगळ्यांसाठी फ्रुटसॅलेडचा बेत होता.सदाशिवच्या घरी पण आनंदाला उधाण आले होते.राजु,संजुनी त्यांच्या लाडक्या बाबांसाठी मस्त ग्रिटींग केले होते.राधाने स्वत:मशिनवर सदासाठी नविन शर्ट ,व लेहंगा शिवला होता.
सगळीकडे एवढे आनंदी वातावरण होते ,पण उत्सवमुर्ती मात्र खिन्न होऊन बसली होती.सदाशिवला आपल्या आईवडीलांची आठवण येत होती.सगळा भूतकाळ नजरेसमोर तरळत होता.शाळेत अतिशय हुशार असणारा सदाशिव आपल्या गरिबीने रंजीस आला होता.घरची ४ भावंडे,जमिनीचा छोटा तुकडा,स्वत:च्या व जमिनदाराच्या शेतात कष्ट करणारे आईवडील प्रसंगी मुलांना पण शाळा बुडवून मजुरीसाठी घेऊन जात,तेव्हाकुठे सगळी तोंडे भरली जात!
सदाशिवला अभ्यासात खुप गोडी होती.पहिल्या ५मध्ये नेहमी त्याचा नंबर असे.१०वी पर्यंतचे शिक्षण अतिशय कष्ट करून त्याने पार पाडले.अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असून सुद्धा १०विला त्याला ८५%मिळाले.शाळेत व ग्रामपंचायतीत झालेल्या सत्कारात त्याने पुढिल शिक्षणाकरता मदतीचे आव्हान केले.
फक्त हेडमास्तर एकबोटे त्याला म्हणाले,”आम्ही तुला शाळेत शिपायाची नोकरी तात्पुरती देऊ,तू रात्रशाळेत जाऊन पुढिल शिक्षण पार पाडावेस”!
सदाशिवला आकाश ठेंगणे झाले.त्याने तात्काळ ह्या मदतीचा स्वीकार केला.नियमीत थोडे पैसे हातात येऊ लागल्याने घरच्यांनी पुढिल शिक्षणांस मज्जाव केला नाही.
बघतां बघतां सदाशिव बी.काॅम झाला.एकबोटे सरांनीच त्याला B.Ed.करायला लावले.दरम्यानच्या काळात त्याचे वडील अर्धांगवायूने आजारी पडले,व त्यांच्या सेवेकरता आईस घरी बसावे लागले.
दोन मोठी भावंडे जमीनीच्या तुकड्यात राबत होती.बहिणीच्या लग्नाला काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता.ह्या सगळ्याचा विचार करून B.Ed.झाल्या झाल्या एका जिल्हापरिषदेच्या शाळेत सदाशिवने नोकरी पत्करली.
दूरच्या गावी त्याची बदली झाली होती.अत्यंत अस्वच्छ गांव त्याच्या वाटेला आले होते.गावातील राजकारण,खोटारडेपणाचा त्याला उबग आला होता.तरी तो आपले शिकवण्याचे काम मनापासून करत होता.मुलांसाठी नवे नवे शिक्षणात प्रयोग आणू पहात होता.
अन् एके दिवशी त्याला असे जाणवले,की आपल्या काही अवयवांमध्ये अशक्तपणा आलाय,चेहऱ्यावर व हातापायांच्या सांध्यावर वेगळीच लाली पसरतेय!वजनही हळू हळू कमी होतेय.
पण कदाचित ह्या मागे आपली नाराज मनोवस्था व घराची वाटणारी ओढ असेल असे वाटून त्याने पुर्ण दुर्लक्ष केले.एके दिवशी तो स्टोव्हवर चहा करत होता, चहात दुध घालून तंद्रीत काहीतरी विचार करत होता.भसाभसा उतू जाणारा चहा बघताच भानावर येत पटकन हातानेच त्याने भांडे उतरवले .अन् सरर्कन त्याच्य अंगावर काटा आला! तापल्या भांड्याचा चटका त्याच्या बोटांना बसला नव्हता !.चेहऱ्यावरची लाली,उतरणारे वजन,हाताच्या बोटांना न जाणवणारी संवेदना ही सगळी धोक्याची लक्षणे होती.
दुसऱ्या दिवशी रजा टाकून,तालुक्याच्या ठिकाणी त्याने डाॅक्टरांना गाठले.कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे असल्याचे जेव्हा डाॅक्टरांनी त्याला सांगितले ,तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
कितीही झाकले तरी त्याच्या रोगाचा बोभाटा नोकरीच्या ठिकाणी झालाच!सक्तीचा राजीनामा शाळेने त्याला द्यायला लावला.
अत्यंत खिन्न मनाने तो आपल्या गावी घरी परतला.तो पोहचायच्या आधीच त्याच्या रोगाची बातमी घरी पोहचली होती.असहाय बाप, व लाचार आई ह्यांना न जुमानता ,दोन्ही मोठ्या भावांनी घराचे दरवाजे त्याला बंद केले!
निराश सदाशिवकडे आत्महत्या हा एकच पर्याय उरला.खरेतर रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत होती,औषोधपचाराने बरे पण वाटले असते,पण रोगापेक्षा,रोग्याबाबतची मानसिकताच आपल्या समाजात तिव्र आहे.
पण म्हणतात नां ,देव सगळी दारे बंद करत नसतो ,एक तरी वाट आपल्याला दिसते!
जीव द्यायला स्टेशनवर गेलेल्या सदाशिवला, त्याच्याच रोगाने त्रस्त झालेल्या भिमाने आनंदवनात आणले.जीथे त्या सगळ्यांना मायेने जवळ घेणारे डाॅ.बाबा आमटे होते.”जीथे वेदनांच्या संवेदना होतात व उरतो फक्त आनंद”ते आनंदवन!साधनाताई त्याच्या आई झाल्या व बाबा आमटे बाबा!
त्याचा पुनर्जन्म झाला!तीथल्या शाळेत तो शिक्षक म्हणून रूजू झाला.निसर्गाच्या कुशीत वसलेला हा आश्रम, त्याचे जीवनच पालटवून गेला.गेलेला आत्मविश्वास त्याने रोगावर मात करत परत मिळवला.
तिथेच त्याला राधा भेटली!त्याच्याच सारखी ,त्याच दुनियेतली!तीच्याबरोबर संसार थाटून देतांना ,बाबांनी व साधनाताईंनी घेतलेला पुढाकार सगळे त्याला बसल्या बसल्या आठवले.नंतर राजू ,संजूच्या जन्माने तर त्याला स्वर्गच हाती आला.पूर्णत:निरोगी असली तरी ही मुले सगळ्यांमधे मिळून मिसळून रहायची.वयाच्या २५व्या वर्षीच मनाने संपलेला तो,केवळ बाबा आमट्यांमुळे अत्यंत समृद्ध अशी २५वर्षेघालवत होता!हे ऋण तो कधी व कसे फेडणार होता?
आज त्याने बाबांवर छान काव्य रचले होते.
सदाशिव भानावर आला.राधेला म्हणाला “चल बाबा व ताईंच्या. पायावर डोके ठेवून आधी आशिर्वाद घेऊ या!सात जन्म घेतले तरी त्यांनी माझ्यावर जे उपकार केलेआहेत,ते ऋण न फिटणारे आहे! मलाच नाही,इथल्या प्रत्येकालाच समाजाने,रक्ताच्या नातेवाईकांनी धि:कारले होते.त्यांना माणूस म्हणून परत
कणा देऊन जगवणाऱ्या बाबा आमट्यांचे ऋण हे कधीच फिटणारे नाही!अगदी कातड्याचे जोडे करून घातले तरी!”
————————
बाबांच्या व ताईंच्या पायावर डोके ठेवताच त्यांनी मनापासून आशिर्वाद दिला “आयुष्य मान भव!सदा सुखी भव!”व म्हटले”सदा तुझ्यासाठी एक खुप आनंदाची बातमी आहे!तुला’आदर्श शिक्षक ‘म्हणून जिल्हापातळीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.आता तू पुर्ण निरोगी आहेस,तुला परत शहरात नोकरी करायची असेल तर तू जाऊ शकतोस!.”
सदाच्या डोळ्यात परत पाणी आले.तो म्हणाला”बाबा का दुर लोटता मला?तुमच्या पायाशीच माझा स्वर्ग आहे!आता कुठलाही पुरस्कार मला तुमच्यापासून दुर करू शकणार नाही!इथली सेवा हेच माझे जीवन”!.

error: