माफीनामा.

 

प्रिय चिं.अमोल

  ह्या जगात पोटच्या मुलाइतकाच तू मला प्रिय आहेस.पण आज तनाने व मनाने देखील तू शेकडो मैल दूर गेलास.

  तूला आठवतेय?लहानपणी तू माझ्यावर किती विसंबून असायचास!प्रत्येक गोष्टीत तूला मी लागे.

  आज मुद्दामुन हा पत्र प्रपंच करतेय, कारण मला तुझी मनापासून माफी मागायचीय.गेली ३वर्षे मी रोज मनात तुझी माफी मागतेय,पण पत्र लिहून माफी मागावी इतका मोठेपणा व धैर्य मात्र आज गोळा केले.

  १२वी ला तूला खुप कमी मार्कस मिळाले, तेव्हा रागावलेल्या आई बाबांपासून मी तूझ्यापाठीशी उभेरहायला हवे होते! पण माझ्याही मस्तकात तूझे मार्क बघून चिड गेली.मी खुप टाकून बोलले.

  खरेतर मिळालेले मार्क्स हे आयुष्यात फक्त कागदोपत्री रहातात!ते जीवन जगायला लायक वा नालायक ठरवत नसतात!हे मी जाणायला हवे होते.पण सासरी तूझे ४८%कसे सांगावे ह्या विचाराने मी तूला नाही नाही ते बोलले.

  पण सोन्या,खरे सांगू घरी येताच मला माझी चूक कळली,व मी खुप रडले.दुसऱ्या दिवशी तुला पोटाशी धरून परत पंख पसरवण्याचे बळ द्यायचे मी ठरवले !जे की ताई म्हणून मी नेहमी देत आले!.

  पण पहाटेच,आईचा फोन आला की एक चिठ्ठी ठेवून तू घर सोडले आहेस.आमच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.तूझा खुप शोध घेतला,पोलीस फिर्याद केली.

 मागच्या वर्षी तुझ्या एका मित्राद्वारे समजले,तू लखनौला कपड्यांचे दुकान टाकले आहेस व बरे चाललेय.आम्ही सगळे धावतच तूला भेटावयास गेलो पण तू परक्यासारखा आमच्याशी वागलास.घरी येण्यास नकार दिलासच पण भेटीतही ओढ दाखवली नाहीस!.

  आज हे पत्र मुद्दामुन लिहीतेय,माफीनामाच म्हण नां,जमले तर सगळ्यांना माफ कर??तेव्हा आम्ही तूला टाकून बोललो चुकलेच आमचे.पण आपली नाती एवढी कमकुवत आहेत का रे?पटकन तोडलीस!

  तू लहान असून तुझी माफी मागतेय,व विनंती करते की परत लहान होऊन माझ्या कुशीत धावत ये!तुझ्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवायला तुझी ही ताई तडफडतेय!

 

 अनेक आशिर्वाद !.

  तुझीच लाडकी?

         ताई.

 

 

प्रती

अमोल जोशी.

साखरपारा,लखनौ.

error: